Breaking News

दोन लोकसभा व एका विधानसभेच्या निवडणूकीत भाजपचा मानहानीजनक पराभव

जयपूर : सत्ताधारी भाजप पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना, आज, राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारली असून, भाजपला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत, सरकारने तीन वर्षांत केलेल्या कामांची पाढा वाचत असताना राजस्थानमध्ये भाजपला नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे. पराभवामुळे जयपूरच्या भाजपच्या कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट दिसत होता.


राजस्थानमध्ये लोकसभेच्या अल्वर आणि अजमेर मतदार संघांसाठी तसेच विधानसभेच्या मंडलगड जागेसाठी पोट निवडणूक लागली होती. यात मंडलगडमध्ये काँग्रेसच्या विवेक धाकड यांनी भाजपच्या शक्ती सिंह यांचा 12 हजार 976 मतांनी पराभव केला. अल्वर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 48 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतल्याने काँग्रेसच्या करण सिंह यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून जयसवंत यादव रिंगणात आहेत.अजमेर लोकसभा मतदारसंघात कांग्रेसने रघू शर्मा यांना रिंगणात उतरविले होते. त्यांनी भाजपच्या राम स्वरूप लांबा यांच्या विरुद्ध 24 हजार 256 मतांची आघाडी घेतली आहे. येथेही काँग्रेसचा विजय निश्‍चित मानला जात आहे.या तिन्ही जागांसाठी भाजप आणि काँग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावले होते. भाजपकडून स्वतः मुख्यमंत्री वसुंधराराजे प्रचाराच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.