Breaking News

अग्रलेख तर दोष कोणाचा?


विकास तर व्हायला हवा पण जर तो संतुलित नसेल तर विकास हा अंगलटही कसा येवू शकतो हे आपण आजकाल नित्याच्या झालेल्या घटनांतून पाहू शकतो. मुंबई व उपनगरांतील बेकायदा बांधकामे आणि त्यांचे कोसळणे यात जाणारे जीव, झोपडपट्ट्या, वाढता भ्रष्ट्राचार आणि अपरिहार्यपणे या विकासाला चिकटलेली असह्य जीवघेणी गुन्हेगारी आणि तरीही अविरत वाढत चाललेले जीवनखर्च या कचाट्यात कथित विकसीत क्षेत्रांत राहणार्‍या जनसामान्यांच्या वाट्याला आलेले अपरिहार्य भाग्य आहे. विकसीत शहरे व भौगोलिक प्रभागांत जेवढ्या सामाजिक समस्या आहेत तेवढ्या तुलनेने अविकसित भागांतही पहायला मिळणार नाहीत. याचे कारण आपल्या विकासाच्या संकल्पनाच बाळबोध आहेत हे नव्हे काय? आणि या सार्‍यात मानवी जीवनाचा गाभा कोठे राहतो? आपणा सर्वांना समस्यांच्या मुळाशी न जाता वरकरणीची सोपी आणि मलमपट्ट्या करणारी उत्तरे हवी असतात. तशीच उत्तरे हवी असतात म्हणुन नेते व प्रशासनेही तशीच उत्तरे देत जातात. बांधकामे बेकायदा असतील तर ती नियमीत करून घ्या कारण मग ज्यांनी आधीच पैसे मोजून घरे घेतलीत त्यांनी कोठे जायचे? असे आगंतूक सल्ले जसे दिले जातात तसेच बेकायदा बांधकामे पडली तर बिल्डरना फाशी द्या अशाही भावनिक मागण्या होतात. मुळात प्रश्‍न असा आहे, कि अशी कायदेशीर असोत कि बेकायदेशीर बांधकामे का वाढत जातात? झोपडपट्ट्या का वाढत जातात? आज मुंबईत जवळपास तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीनींवर झोपडपट्ट्या आहेत. जवळपास 40% मुंबई झोपडपट्ट्यांत राहते असे अंदाज आहेत. बेकायदेशीर बांधकामांनी व्यापलेला भाग जवळपास चारशे हेक्टर एवढा आहे. हे अंदाज काहीही असोत, वास्तव एवढेच आहे कि मुळात एवढी लोकसंख्या मुंबईत स्थलांतरीत का झाली? हा एक चक्रव्युह आहे हे आधी आपण समजावून घ्यायला पाहिजे. मुंबईत अनेक उद्योग-व्यवसाय आणि त्यात राजधानी असल्याने असंख्य केंद्र व राज्य सरकारी कार्यालये केंद्रीत होत गेले म्हणुन तेथील अधिकारी ते कर्मचारी व कामगार स्वाभाविक पणे स्थायिक होत गेले. या जनसमुहाच्याही असंख्य गरजा असतात ते पुरवणारेही तेथे येत जाणेही तेवढेच स्वाभाविक होऊन गेले. या गरजा पुरवणार्‍यांच्याही अन्य गरजा असतात त्याही भागविण्यासाठी, सरकारी असो कि खाजगी, जनसंख्या लागत जाते. यातुनच चक्रवाढ पद्धतीने लोकसंख्या एकाच ठिकाणी केंद्रीभूत होऊ लागते. मुंबईचे (व अन्य शहरांचेही) नेमके असेच होत गेले आहे. असे कोणते उद्योग होते जे फक्त मुंबईतच उभारले जावू शकत होते? कापड उद्योग हे स्वाभाविक आणि नैसर्गिक कारण आहे. पण हा उद्योग संपुष्टात येऊन आता काळ उलटला. रस्ते व रेल्वे या पायाभूत सुविधा सुरुवातीपासून निर्माण केल्या गेल्या असत्या तर निर्यातप्रधान उद्योग मुंबईत राहण्याचे अथवा उभारले जाण्याचे कारणच नव्हते. मुंबई खरे तर फक्त व्यापार-विनिमयाचे केंद्रक बनवले जाणे धोरणात्मक दृष्टीने गरजेचे होते. पण उद्योगांचेही (अगदी सिनेसृष्टीचेही) केंद्रीकरण तेथेच (मर्यादित भौगोलिक अवकाश असतांनाही) होत गेल्याने आज मुंबई ही एक गंभीर समस्या बनली आहे व ती भविष्यात विकराल होईल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. आणि याला विकास म्हणता येत नाही. मुंबई हे एक उदाहरण म्हणुण घेतले आहे, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी त्याच वाटेवर चालत आहेत.