Breaking News

बंद पडलेला सप्ताह सोहळा सुरु ; महंत शास्त्री यांनी केले महिलांचे कौतूक

पाथर्डी / शहर प्रतिनिधी ;- तालुक्यातील आगसखांड या गावातील महिला बचत गटांतील महिलांनी राजकारणामुळे बंद पडलेला अखंड हरिनाम सप्ताह पूर्ववत सुरु केला.त्यामुळे तारेकेश्वर गडाचे महंत ह. भ. प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी या बचत गटांतील महिलांचे तोंडभरून कौतूक केले.


अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आजवर सर्वत्र पुरुष मंडळीचाच पगडा असल्याचे दिसून यायचे. पारंपारिक पद्धतीने तोच पायंडा आगसखांड या गावातही सुरु होता. परंतु गावातील किरकोळ वादामुळे गेल्यावर्षी हा सालाबादप्रमाणे सुरु असलेला सप्ताह बंद झाला. विशेष मागास प्रवर्गाच्या जिल्हा महिलाध्यक्षा तथा उपजिविका महिला सहयोगिनी भारती असलकर यांच्या प्रेरणेने या गावांतील महिला बचतगटांनी हा सप्ताह पूर्ववत सुरु ठेवण्याचा निर्धार करुन तो यशस्वीपणे पारही पाडला. त्यामुळे या महिलांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वरी पारायण, भागवत प्रवचन व सायंकाळी हरिपाठ अशी सर्व प्रक्रिया या सप्ताहात महिलांनीच पार पाडली. भैरवनाथ महिला बचत गट, संपदा महिला बचत गट, रामदास महिला बचत गट, शेतकरी महिला बचत गट, श्रद्धा महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, कैवल्य महिला बचत गट व वसुंधरा महिला बचत गट इत्यादी महिला बचत गटातील महिलांनी या क्रांतिकारी सप्ताहाचे आयोजन केले होते.