Breaking News

भांबोर्‍यात पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात संपन्न


कुळधरण / प्रतिनिधी ;- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भांबोरा, दुधोडी, बेर्डी, सिध्दटेक, जलालपूर, बारडगाव, अंबालिकानगर आदी ठिकाणी उत्साहात साजरी झाली. डीजेला फाटा देऊन पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भांबोरा येथे शिवजयंती उत्सव समितीसह ग्रामस्थांच्यावतीने चांदीच्या रथाला सजावट करून शिवप्रतिमेचे रथातून गावप्रदक्षिणा घालण्यात आली. सिध्देश्‍वर मंदिरात शेकडो महिलांच्या उपस्थितीत पाळणा गीते गाऊन शिवजन्म साजरा करण्यात आला.
शंभुराजे इंग्लिश मेडिअम स्कूलचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करुन मिरवणुकीत सहभागी झाले. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावप्रदक्षिणेत लहान मुले, महिला, तरुण, ग्रामस्थ सहभागी झाले होते. संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग भाषणांमधून सांगितले. त्यानंतर शिवप्रतिमेची पारंपारिक आरती करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवजयंती उत्सवामुळे संपूर्ण सिद्धटेक परिसर शिवमय झालेला होता.