Breaking News

साखरेचे भाव वाढल्यास उसाला भाव वाढवून देणार का?


केदारेश्‍वरने जाहीर केलेल्या भावात तफावत का केली, याबाबतचे स्पष्टीकरण कारखाना प्रशासनाने देण्याची मागणी शेवगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. हंगामाच्या सुरूवातीला बोधेगाव येथील केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाला 2550 रुपये भाव जाहीर केला होता, तसेच 24 तासाच्या आत खात्यावर पेमेंट अदा करण्याचे सांगितले होते, तसेच कार्य क्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केदारेश्‍वरला ऊस द्यावा असे आवाहन केदारेश्‍वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, मोहोटादेवी शुगरचे अध्यक्ष अतुल दुगड यांनी केली होती, परंतु आजमितीस कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्‍यांमध्ये ऊस दरासंदर्भात भेदभाव करून शेतकर्‍यांची पिळवणूक कारखाना प्रशासन करत आहे, ऊसाचे पेमेंट वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे, साखरेचे भाव घसरल्याने ऊसाचे भाव कमी केले, भविष्यात साखरेचे भाव वाढल्यास उसाला भाव वाढवून देणार का? याबाबतचे स्पष्टीकरण कारखाना प्रशासनाने लेखी स्वरुपात द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन केदारेश्‍वर, मोहटादेवी शुगर प्रा. लि.चे सरव्यवस्थापक वजीर सय्यद यांच्याकडे केली आहे, यावेळी स्वाभिमानीचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, ता. उपाध्यक्ष दादा पाचरणे, बाळासाहेब फटांगडे, भिमराज फडके उपस्थित होते.