Breaking News

वैरागकर संगीत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

नाशिक, दि. 03, फेब्रुवारी - वातावरणात पसरलेला गारवा...एकाहून एक सरस स्वरांची बरसात...साथसंगतीला तितक्याच तोलामोलाचे संगतकार अशा माहोलमध्ये गुरूवंदना कार्यक्रमाला चार चाँद लागले ते पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरांनी. पाहता पाहता आपल्या स्वरांनी त्यांनी मैफल ताब्यात घेतली 

मैफलीचा श्रीगणेशा पुर्या धनश्री रागाने करून पं. सुधाकर चव्हाण यांनी वातावरण निर्मीती केली. पं. सुधाकर चव्हाण हे किराणा घराण्याची सोनेरी किनार आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा आशीर्वाद लाभलेले पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य असून गुरुवंदना कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांच्या गायनाने झाला. पुरिया धनश्रीनंतर त्यांनी विलंबित एकताल पेश केला. बीत गए जुगवा पीहरवा, अवघा रंग एक झाला या रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना गायन साथ शिवानंद स्वामी यांनी केली.
परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे पंडित शंकरराव वैरागकर यांना शिष्यवृंदांनी दिलेली अनोखी भेट असलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्धसंतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पं. डॉ. धनंजय दैठणकर,खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, गुरुवर्य पं. शंकरराववैरागकर,ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे सचिव शशांक मणेरीकर, संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.