विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील: सभापती नागवडे
तालुक्यातील वांगदरी येथील 52 लाख 67 हजार रुपये अंदाजित खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन नुकतेच सभापती नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य जिजाबापू शिंदे हे होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पक्ष, गट-तट व राजकारण हे फक्त निवडणुकीपर्यंत मर्यादित ठेवल्यास गावांचा अधिक वेगाने विकास होवू शकेल. गावातील कामे दर्जेदार होण्यास मदत होईल.लोकप्रतिनिधी असल्याची मला जाणिव असल्याने मी राजकारणविरहीत भूमिकेतून विकासकामांकडे पाहाते. वांगदरीतील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला असून, गटातील अन्य गावांनाही असाच निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कामे करताना गटातील गावे व गटाबाहेरची गावे असा भेदभाव मी करीत नाही. तालुक्यातील सर्वच गावांना न्याय देण्याची माझी भूमिका असल्याचे सांगून नागवडे म्हणाल्या की, हंगेवाडी व वांगदरी या गावांना 'क' वर्ग देवस्थानांचा दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा अंतिम टप्प्यात आहे. तर दावल मलिक (मढेवडगाव), खाकीबा (पिसोरे खांड) येथील देवस्थानांच्या विकास व सुशोभीकरणासाठी अल्पसंख्याक विभागाचा निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची आमची जबाबदारी आहे. या निधीचा सदुपयोग होवून दर्जेदार कामे करण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी दर्जाहीन कामे खपवून घेतली जाणार नाहीत. असा इशारा अधिकारी व ठेकेदारांना दिला आहे.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाबापू शिंदे म्हणाले की,शिवाजीराव व राजेंद्र नागवडे यांचा वसा व वारसा घेवून विधायक राजकारण करणा-या अनुराधा नागवडे यांचे काम कौतुकास्पद असून त्यांच्या नेतृत्वाखाली बेलवंडी जिल्हा परिषद गट विकासात अग्रेसर राहील. सभापती नागवडे यांचा जनसंपर्क, प्रश्नांचा बारकाईने अभ्यास व मांडणी तसेच प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी पाठपुरावा करण्याची पध्दत राजकारण व समाजकारणात नव्याने येणा-यांसाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रास्ताविक उपसरपंच महेशशेठ नागवडे यांनी केले. यावेळी मेजर निवृत्ती ठोकळ यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी राणीताई फराटे-जगताप, उपअभियंता डी.डी.कांगुणे, सरपंच कमल सोनलकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र नागवडे, दत्तात्रय मासाळ, अॅड.विश्वास नागवडे, बंडोबा सोनवणे, अशोकराव नागवडे, दगडू सोनलकर, मधुकर नागवडे, साहेबराव महारनूर, बापूराव चोरमले, अभियंता एन.एन.फुलारी,रोहिदास नागवडे आदि मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निळकंठ नागवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर ग्रामविकास अधिकारी अनिल जगताप यांनी आभार मानले.
