Breaking News

अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपुजन. विरोधक अजूनही नोटाबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचा पंतप्रधानांचा टोला

अबुधाबी : पॅलेस्टाईनच्या दौर्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाले असून, त्यांनी अबुधाबीत युएईचे युवराज मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपुजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले. स्वामीनारायण संप्रदायातर्फे हे मंदिर बांधण्यात येणार असून संप्रदायाच्या साधूंनी मोदी आणि युवराज मोहम्मद बीन झायेद यांची भेट घेऊन मंदिराची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले.


अबुधाबीत भारतीय समुदायासमोर आपले मनोगत व्यक्त करताना मोदींनी जीएसटी, नोटबंदी आणि इतर मुद्द्यांवर आपले सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचे सांगितले. आपल्या सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामान्य माणसाच्या हिताचे होते आणि त्या निर्णयांच्या बाजूने सामन्य माणूस उभाही राहिला. मात्र विरोधक अजूनही नोटाबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केले. तुम्ही पाहत असलेले स्वप्न एक दिवस नक्की प्रत्यक्षात अवतरेल, अशी हमी मोदी यांनी भारतीयांना दिली. संयुक्त अरब अमिरातीत दोन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या मोदी यांनी अनेक करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा दुसरा यूएई दौरा आहे. यापूर्वी 2015 मध्ये ते संयुक्त अरब अमिरातीत गेले होते. अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने मोदी यांनी वली अहमद शहजादा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार व्यक्त केले. ‘हे हिंदू मंदिर फक्त वास्तुकला आणि भव्यतेच्या दृष्टीनेच अद्भूत नसेल, तर यातून वसुधैव कुटुंबकम हा संदेशही अख्ख्या जगाला मिळेल.’ असा विश्‍वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. 50 हजार चौरस मीटर जागेवर अबुधाबीत पहिले हिंदू मंदिर तयार होणार आहे. भारतीय शिल्पकार याची रचना करत असून 2020 पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल. सर्वधर्मीयांसाठी हे मंदिर खुलं असेल, असंही मोदींनी सांगितले.