Breaking News

गारपिटीचा तडाखा, चार शेतकर्‍यांचा मृत्यू ; मराठवाडा, विदर्भाला जोरदार फटका ; पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान.

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीचा तडाखा बसला असून, अनेक भागात गारपिट झाली. शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा इथले 60 वर्षीय वृद्ध आसाराम गणपत जगताप यांचा मृत्यु झाला तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून, आणखी एक महिला जखमी आहे.


अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील अंदुरा आणि परिसरात सकाळी 7:30 दरम्यान विजेच्या कडकडासह पाऊस झाला. त्याचवेळेस गारपीटही सुरु झाली. गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा पिकाचे नुकसानीची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने गारपीटीसह पाऊस होण्याचा इशारा देखील दिला होता. रविवारी भल्या पहाटे जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागात तसेच मंठा तालुक्यात सकाळी 7 ते 8 वाजेपर्यन्त 1 तास गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे सध्या पीक काढणीचे दिवस असून गहू, ज्वारी, हरभरा सोंगणे आणि मळणी यंत्रातून काढणीचे दिवस आहेत आणि अशातच बळीराजावर अवकाळी पावसाचे संकट कोसळले. परिणामी हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून जात असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.