Breaking News

बीएसएनएल कामगारांनी घेतली खा. विनायक राऊत यांची भेट

सिंधुदुर्ग, दि. 05, फेब्रुवारी - बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा सहा महिन्यांचा पगार व ईपीएफ न मिळाल्याने कर्मचारी वास्को-गोवा येथील कामगार अधिकारी यांच्याकडे गेल्याच्या रागातून अधिकार्‍यांनीच कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केले, असा आरोप कंत्राटी कामगारांनी करून याकडे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले.


आपण याबाबत सी. जी. एम. कार्यालयाशी बोलून तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्‍वासन राऊत यांनी दिले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांना कमी केल्याने मोबाईल टॉवर, मोबाईल सेवा, लँडलाईन कनेक्शनची सेवा विस्कळीत होऊ लागली आहे.
बीएसएनएलच्या सत्तर टक्के कंत्राटी कामगारांना अधिका-यांनी तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगत सेवेतून दूर केल्याचे पुढे येत आहे. त्या विरोधात कामगार एकवटले आहेत. त्यांनी खासदार राऊत यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडत निवेदनही सादर केले. शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.