Breaking News

कोकण दुधाची पंढरी व्हावी - खा. विनायक राऊत

रत्नागिरी - कोकणात शेतकर्‍यांच्या जमिनीत तुकड्यात आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पीक मोठ्या प्रमाणात घेता येत नाही. याला छेद देण्यासाठी गटशेती हा नवीन प्रयोग केला जात आहे. भविष्यात कोकण दुधाची पंढरी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जावे, याकरिता शेतीबरोबरच प्रत्येक गावातून एक हजार लिटर दुधाचे उत्पादन होईल, अशा पद्धतीने कृषी विभागाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी केले. 


महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या जिल्हा कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन केल्यानंतर राऊत बोलत होते. येथील प्रमोद महाजन क्रीडासंकुलात पाच दिवसांच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले.