Breaking News

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही - कांतीलाल कडू


पनवेल  - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सांगण्यावरून राज्य शासनाने महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुदतपूर्व बदली केली तर पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात एकाही मंत्र्यांना फिरकू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिला. आज, शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेल संघर्ष समितीने रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी हा सर्वांनुमते निर्णय घेतला. या एकमुखी निर्णयाला उपस्थितांनी हात उंचावून समर्थन दिले.
डॉ. शिंदे यांचा प्रमाद काय? याबाबत सत्ताधारी नगरसेवक, महापौर यांनी बोलावे. प्रशासन चुकत असेल तर नगरविकास खात्याकडे, राज्य शासनाकडे लेखी पुराव्यांसह सनदशीर मार्गाने तक्रार करावी. असे काहीही सत्ताधार्यांनी केले आतापर्यंत केले नाही. मग आयुक्तांविरोधात तांडव करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल कडू यांनी केला. आयुक्तांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाचा शुभारंभ करताना सत्ताधार्यांना काहीच वाटले नाही. असे असताना आयुक्तांमुळे विकास कामांचा खोळंबा होत असल्याचे कोणत्या तोंडाने ते सांगतात, असा प्रश्‍न कडू यांनी उपस्थित केला.