Breaking News

बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात सात कोटींचा फसवणुकीचा गुन्हा


पुणे : पिंपरी गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश वाधवानी यांच्यावर तब्बल सात कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहेखेमचंद उत्तमचंद भोजवाणी (वय 53, रा. वाकड पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात नरेश वाधवानी, जनाबाई काटे, सुरेश काटे, राजू काटे, संतोष काटे, वैशाली काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश वाधवानी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नंबर 40 येथील 120 आर जमिनीचे खरेदी आणि विकसनाचा हक्क त्यांचे भागीदार कन्हैयालाल होतचंद मतानी यांना प्राप्त असताना नरेश वाधवानी यांनी आपल्या काही साथीदारांसोबत संगनमत करून कायदेशीर बाबींची पूर्तता न करता कन्हैयालाल मतानी यांची सहा कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शेटे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, जमीन गैरव्यवहार प्रकरणी नरेश वाधवानी यांना डिसेंबर, 2017 मध्ये चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी वाधवानी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी अटक केली होती.