Breaking News

‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन - राज्यपाल


मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन देत उद्याचे दर्जेदार खेळाडू घडविण्याचे काम होत आहे. आगामी काळात होणार्‍या ऑलिम्पिक आणि एशियन गेम्ससह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करतील, असा विश्‍वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल म्हणाले की, आज भारत देश सुपर पॉवर म्हणून पुढे येत असून अशा वेळी भारतात उत्तमोत्तम खेळाडू तयार होणे आवश्यक आहे. आता भारत स्पोर्टिंग नेशन’ म्हणून पुढे येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आज वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत आहे. आज महाराष्ट्रात दर्जेदार, उत्तम खेळाडू घडविण्यासाठी महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करण्याची गरज असून ते स्थापन झाल्यास या विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडतील, असा विश्‍वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे पुरस्कार आहेत, यावरुन पुरस्काराचे महत्त्व आपल्या लक्षात येते. आज महाराष्ट्रात विविध खेळांमधून चांगले खेळाडू घडत असताना महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांचे संवर्धन आणि जतन होणे ही काळाची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या ‘खेलो इंडिया’ च्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन देत उद्याचे दर्जेदार खेळाडू त्यामाध्यमातून घडविण्याचे काम होत आहे. आगामी काळात होणार्‍या ऑलिम्पिक आणि एशियन गेम्ससह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करतील, अशी अपेक्षाही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पारदर्शकतेवर भर देण्यात आला असून या पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्यात आले आहेत. खेळाडूंचे गुणांकन योग्य पद्धतीने व्हावे आणि योग्य खेळाडूंना पुरस्कार देण्याचा प्रयत्न असल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या पुरस्काराच्या यादीत बुद्धिबळ हा खेळसुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे असे सांगून या पुरस्कारांमुळे येणार्‍या काळात महाराष्ट्रातील खेळाडू चांगली प्रगती करतील, असा विश्‍वासही तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. आज झालेल्या कार्यक्रमात तीन वर्षांचे मिळून 195 खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.