Breaking News

सहकारी संस्थांमुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट : डॉ. थोरात .


संगमनेर प्रतिनिधी :- अर्थशास्त्र हे सामाजिकशास्त्र आहे. त्यामुळे आपण भूतकाळाचा आभ्यास केला पाहिजे. त्यानुसार आपण गृहित तयार केले पाहिजे. त्यामुळे भविष्यकाळातील परिस्थितीचा वेध घेता येतो. स्व. भाऊसाहेब थोरातांनी भविष्याचा वेध घेत ज्या सहकारी संस्था सुरु केल्या, त्या संस्थांमुळेच संगमनेरची अर्थ व्यवस्था बळकट झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. यशवंत थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सेक्रटरी चंद्रकांत कडलग, रघुनाथ शिंदे, प्राचार्य आर. के. दातीर, बाबुराव गवांदे, एस. डी. आव्हाड आदींसह नेपाळ, मॉरिशस येथील संशोधक उपस्थित होते. या परिषदेसाठी इतर राज्यांतील १४ आणि परदेशांतून १० संशोधक उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाले, की २०५० साली जागतिक अर्थ सत्ता ही फार मोठी असेल. २०४२ साली ग्लोबल इकॉनॉमी ही आजच्या दुप्पट होईल. आशिया खंडातील उदयोन्मुख आर्थिक सत्तांचा यामध्ये फार महत्वाचा सहभाग असेल. गेल्या २५ वर्षांत आशियाई राष्ट्रांनी केलेल्या प्रगतीमुळे जगाचे पॉवर स्ट्रक्चर बदलले आहे. २०२५ पर्यंत आशिया खंडातील १० राष्ट्रे ही आर्थिक सत्ता बनतील. त्यामध्ये प्रथम क्रमांक चीनचा असेल व दुसरा क्रमांक हा भारताचा असेल. आशियाई राष्ट्रांचा जेडीपी दर जागतिक जीडीपी दरांच्या टक्के असेल. मध्ये चीनचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय होईल.जगाच्या २० टक्के जीडीपी चीनचा व २० टक्के जीडीपीचा हिस्सा भारताचा असेल. आर्थिक महासत्ता होण्यासाठी आपल्याला आर्थिक पुर्नरचना करावी लागेल. तसेच आपल्याला सर्व जगाशी व्यावसायिक संबध जोपासावे लागतील. आशिया राष्ट्रांमध्ये प्रशासन व राजकारण यामध्ये सुधारणे होणे गरजेचे आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वाढले पाहिजे. 

यावेळी आ. थोरात म्हणाले, की भाऊसाहेब थोरात विद्यालयाने आयोजित केलेल्या आंतराष्ट्रीय परिषदेमुळे विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व समाज यांना खूप फायदा होणार आहे. या परिषदेमुळे माहिती व ज्ञान यांचे आदन प्रदान होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थशास्त्र या विषयावर परिषद घेतल्यामुळे एक चांगली संधी महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, की भारतामध्ये असमानता व गरीबी या दोन फार मोठ्या समस्या आहेत. फक्त दोन वेळचे जेवण मिळाले म्हणजे गरीबी दूर झाली, असे नाही. आज समाजातील सर्व लोकांना अन्न, वस्त्र निवारा, पाणी, आरोग्य व सामाजिक सुरक्षा या गोष्टींची नितांत गरज आहे. प्रारंभी डॉ. एस. डी. आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी स्वागत केले. तर प्रा. डॉ. प्रमोदिनी कदम यांनी आभार मानले.