Breaking News

‘प्रवरा’च्या संवर्धन आणि संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा संकल्प


संगमनेर / प्रतिनिधी। येथील प्रवरा नदीपात्राचे संवर्धन आणि संरक्षण करण्‍याची हजारो विद्यार्थ्‍यांनी संकल्प सोडला. ‘प्रवरा दौड’च्‍या निमित्ताने ‘नमामी प्रवरा’ असा जयघोष करत या विद्यार्थ्‍यांनी प्रवरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍यावतीने सुरु करण्‍यात आलेल्‍या ‘प्रदुषणमुक्‍त प्रवरा’ या अभियानाच्‍या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्‍या ‘प्रवरा दौड’मध्‍ये विद्यार्थी गटात कमलू कोते आणि विद्यार्थीनी गटात साक्षी फापाळे यांनी प्रथम क्रमांचे पारितोषिक मिळविले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍यावतीने प्रवरा नदी प्रदुषणमुक्‍त करण्‍यासाठी लोकसहभागातून अभियानास सुरुवात झाली आहे. अभियानाचा पहीला टप्‍पा म्‍हणून, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा दौडचे आयोजन करण्‍यात आले होते. शहरातील क्रिडा संकुलापासून, या प्रवरा दौडला सकाळी ८ वा. प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरुन प्रदुषणमुक्‍त प्रवरा नदीचा संदेश घेऊन हजारो विद्यार्थी प्रवरा नदीच्‍या दिशेने धावले. या प्रवरा दौडमध्‍ये विद्यार्थी गटातून कमलु कोते याने प्रथम क्रमांकाचे रुपये ५ हजाराचे रोख पारितोषिक मिळविले. व्दितीय क्रमांक शाम वाघ आणि किशोर भटकर याने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थीनी गटात साक्षी फापाळे हीला प्रथम क्रमांक मिळाला. प्रियांका वाळे, दिपाली गलांडे यांना व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला. संघचालक अशोकराव सराफ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय संघटनमंत्री सम्राट माळवदकर, प्रदेश सहमंत्री आकाश अभंगराव, जिल्‍हासंघटन मंत्री नंदकुमार बिजलगावकर आदींच्या हस्‍ते विजेत्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले.

गंगामाई घाटावर संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमात बोलताना प्रदेश सहमंत्री आकाश अभंगराव यांनी भूमिका विशद केली. विभागीय संघटनमंत्री सम्राट माळवदकर यांनी विद्यार्थी परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी शहरमंत्री क्षोण थोरात यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिभव देशमुख, प्रितेष माळी, कल्‍याणी बेल्‍हेकर, मानसी जोशी, शितल वाळे, शुभम गडाख, ओमकार डावरे, यश देशपांडे, सचिन पवार, रवी कदम, सुरेंद्र शेळके, शुभम पाचपुते, निलेश आहेर आदींनी परिश्रम घेतले.