Breaking News

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई अधिक धारदार करू--कॉ.स्मिता पानसरे


भेंडा/प्रतिनिधी /- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अधिक तीव्र होत असून, शेतकरी व सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावरची लढाई अधिक धारदार करणार असल्याची ग्वाही भाकपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या कॉ. स्मिता पानसरे यांनी दिली.

सौंदाळा (ता.नेवासा) येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेवासा तालुका पक्ष परिषद पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना कॉ.पानसरे बोलत होत्या. कॉ.बाबा आरगडे, कॉ.बंशी सातपुते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कॉ. पानसरे पुढे म्हणाल्या,राज्यातील सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱयांची चक्क फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री,सहकार मंत्री, अर्थमंत्री यांच्या माहितीमध्ये प्रचंड तफावत असून अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकलेली नाही. नव्या कर्जदार शेतकर्याला बँका आज ही बँकेच्या दारातही उभे करत नाही. प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन, जनधन योजना, नोटाबंदी ,जीएसटी, शेतकरी आत्महत्या हे कळीचे प्रश्न झालेले असून शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. याबाबत मौन बाळगून शासन अप्रत्यक्षणे शेतकरी विरोधी भूमिका पार पाडत आहे.

भाकपच्या या पक्ष परिषदेत शेतकरी-शेतमजुरांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्याचा कायदा करावा, मनरेगा शेती कामाशी जोडावे, शेतीला मोफत वीज द्यावी, महिला अत्याचार विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के नफ्यासह भाव द्यावा आदी ठराव मंजूर करण्यात आले. परिषदेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेवासा तालुका सचिवपदी कॉ.भारत आरगडे तर सह सचिवपदी कॉ. शोभा शिंदे, कॉ.भाऊसाहेब दारकुंडे यांची निवड करण्यात आली.