Breaking News

न्यायासाठी मंत्रालयाच्या दारात पुन्हा एक शेतकरी

मुंबई : धुळे येथील धर्मा पाटील यांनी आपल्याला न्याय मिळत नसल्यामुहे मंत्रालयात विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली होती. धर्मा पाटील प्रकरण शमत नाही तोच मंत्रालयाच्या दारात पुन्हा एक धर्मा पाटील न्यायासाठी उभे आहेत. त्यांचे नाव आहे राजाराम गायकवाड. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरमकुंडी गावातल्या राजाराम गायकवाड यांची हायवेत अर्धा एकर आणि राहते घरही गेले आहे. 


दलालांनी त्यांच्यावर दमदाटी सुरू केली. तर सरकारी यंत्रणा राजाराम आजोबांना फक्त नडण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे ते अखेर न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या दारात आल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. मंत्रालयात कुणी म्हणाले मुख्यमंत्र्यांना अर्ज द्या...कुणी सांगितले विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर जा. राजाराम गायकवाड यांनी हे सर्व ऐकत आपल्या परीने लढा सुरू ठेवला आहे. कारण त्यांना फक्त न्याय हवा आहे.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रशासकीय यंत्रणेला फोन केला. पण या फोनवर राजाराम यांचे काम होईल की नाही याबाबत शंका आहे. धर्मा पाटील यांच्यासारखे अनेक पीडित शेतकरी महाराष्ट्रात आहेत ज्यांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयाच्या दारात येऊन विष प्यायल्यावरच त्यांना न्याय मिळेल का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.