Breaking News

कचर्‍यातूनच पुरावे शोधण्याचा पालिकेचा निर्णय

सिंधुदुर्ग, दि. 25, फेब्रुवारी - स्वच्छता मोहीमेचा डंका पिटल्यानंतर तो यशस्वी करण्यात अडथळे निर्माण करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कचरा कोणी टाकला, याचा सुगावा बर्‍याचदा लागत नाही. त्यामुळे कचरा करणार्‍याचा शोध घेताना कचर्‍यातूनच पुरावे शोधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही अनोखी मोहीम नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरात बिरोडकर टेंब परिसरात राबवली. 


या मोहीमेत सहा जणांचा शोध घेण्यात पालिका प्रशासनाला यश आले. सहा जणांना बोलवून त्यांना समज घालण्यात आली. मात्र, पुढील काळात थेट दंडात्मक कारवाई क रण्याच्या सूचना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या आहेत. नगराध्यक्ष बबन साळगावकर बिरोडकर टेंब परिसरातील कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचर्‍याचा खच दिसला. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी पालिका कर्मचार्‍यांना बोलावले आणि टाकण्यात आलेल्या कचर्‍यातूनच त्यांनी कचरा टाकणार्‍यांचा शोध घेण्याचे ठरविले. त्यांनी कर्मचार्‍यांसोबतच आपणही कचर्‍यातून पुरावे शोधण्यास प्रारंभ केला. त्यात काही जणांचे मोबाईल नंबर तर काही जणांची नावे आढळली. त्या सर्वांना बोलावून समज देण्यात आली.