Breaking News

नियम धाब्यावर बसवून उभारली भव्य रुग्णालये


संगमनेर श. प्रतिनिधी ;- येथील वैद्यकिय क्षेत्रात मोठा सावळागोंधळ सुरु आहे. रुग्णांची आर्थिक लूट करून मालामाल झालेल्या अनेक डॉक्टरांनी बांधकामाबाबतचे नियम धाब्यावर बसविले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून भव्य रुग्णालये बांधली आहेत. नगर परिषदेच्या मार्ग रचना विभागाने कसून चौकशी केल्यास येथील अनेक डॉक्टरांच्या रुग्णालयांच्या बांधकामाचा करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.
संगमनेरचे वैद्यकीय क्षेत्र जिल्ह्यात नावाजले आहे. पुणे, मुंबईला मिळणाऱ्या सुविधा संगमनेरला मिळत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. मात्र असे असले तरी संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात सुरु असलेल्या आर्थिक गडबडींमुळे हे क्षेत्र बदनाम होत आहे. रुग्णांची होणारी आर्थिक लूट हा कायम चर्चेचा विषय आहे. मात्र याबाबत कोणीही विरोध नोंदविण्यास रस्त्यावर उतरत नाही. ही शोकांतिका आहे. गेल्या पंधरा वर्षांत संगमनेर शहर व परिसरात अनेक मोठमोठी रूग्णालये सुरु झाली आहेत. शहरातील नवीन नगररोड तर ‘हॉस्पिटल रोड’ बनला आहे. या रस्त्यावर पावलो पावली असणारी रुग्णालये चर्चेचा विषय बनला आहे.

रुग्णालयाची इमारत बांधतांना शासनाने जे निकष ठरवून दिले आहेत, त्या निकषांचे पालन कोणीही करतांना दिसत नाही. पार्किंगची व्यवस्था यासारखे अनेक निकष पायदळी तुडवून विविध रुग्णांलयाच्या इमारती थाटामाटात उभ्या राहिल्या आहे. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम परवाना देतांना हे निकष का लावले नाहीत, असा सवाल येथील सूज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.