Breaking News

शेतकर्‍यांना आठवडाभरात पीक विम्याचे पैसे द्या - विजयकुमार


पुणे, - पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. खरीप 2017 मधील योजनेत सहभागी शेतकर्‍यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश बाबत अपर मुख्य सचिवांनी दिले.दोन आठवड्यांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत आढावा बैठक घेतली होती, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठीअपर मुख्य सचिवांनी पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. ‘विमा कंपन्यांना सरकारने पीक उत्पादकतेविषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी,’ असे विजयकुमार म्हणाले. त्यावर बँकांमार्फत शेतकर्‍यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याचे विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले.राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका. त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा, अशा स्पष्ट सूचना अपर मुख्य सचिव विजयकु मार यांनी या वेळी बोलताना केल्या.