Breaking News

पालिका हद्दीतील शेतकऱ्यांना न्याय द्या: रमेश गोरे


पाथर्डी/शहर प्रतिनिधी/- नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा तसेच नगरपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळतात तशा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याने अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी, पाथर्डी नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरे यांनी, नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सादर केलेल्या निवेदनात कशाप्रकारे सरकारच्या विविध योजनांपासून शहरी भागातील शेतकरी वंचीत राहात आहेत. याचा सविस्तर खुलासा गोरे यांनी केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजना, साठवण बंधारे, पाणलोटक्षेत्र विकास आदी योजनांतर्गत अनुदान मिळते. परंतु महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगर पंचायतींच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना अशा कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. एकीकडे नागरी जनजीवन सुसह्य होण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना, या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र कसल्याही योजना उपलब्ध होत नसल्याने अशा शेतकऱ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे.