Breaking News

रहिवासी भागात बिबट्याचा मुक्त संचार पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा


संगमनेर/प्रतिनिधी। शहरातील नदीकाठच्या भागातील दाट लोकवस्ती असलेल्या रहिवासी भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पंपिंग स्टेशन परिसरात बिबट्याने दर्शन दिले. पहाटेच्यावेळी आलेल्या या बिबट्याने बांधलेल्या एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. बिबट्याचा हा प्रकार घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली.
शुक्रवारी {दि.२३} पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पंपीग स्टेशनजवळ पारिजात कॉलनीत राहणारे रविंद्र शिंदे यांच्या घराबाहेर बांधलेल्या कुत्र्याचा सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात पहाटेच्या वेळी बिबट्या आल्याचे तसेच तो परत जात असल्याचे चित्रिकरण झाल्याचे आढळून आले. तसेच त्याने या कुत्र्याचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले.विशेष म्हणजे वनविभागाकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने या परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.