Breaking News

शेवगाव शहरामध्ये रोडरोमिओंचा पुन्हा उच्छाद


शेवगाव शहरामध्ये रोडरोमिओंनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे.पोलिस प्रशासनाने या गोष्टीकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील व ग्रामीण भागातील पालक करत आहेत. मध्यंतरी पोलिसांच्या कारवाईमुळे कमी झालेली रोडरोमिओंची टगेगिरी पुन्हा डोके वर काढत आहे. रोडरोमिओंचे मिरी रोड परिसरातील टवाळखोरी कमी झाली असली, तरीही या रोडरोमिओंनी नवीन ठिकाणांचा शोध लावला असून शहरातील संत गाडगेबाबा चौक, आखेगांव चौक, बस स्थानक परिसर आदी ठिकाणी हे रोडरोमियो शालेय विद्यार्थिनींना त्रास देतात, तसेच मुलींना धमकावणे, ग्रामीण भागातील विद्यार्थीनी आपल्या पालकांना या गोष्टी सांगायला घाबरतात कारण घरी सांगितलं, तर आपली शाळा कायमची बंद होईल, या भीतीने या विद्यार्थिनी घरी सांगत नाहीत. विद्यार्थीनी त्रस्त आहेत, त्यामुळे पोलिस प्रशासनाने किमान शाळा सुटतेवेळी तरी या परिसरात पेट्रोलींग करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. तसेच पोलिस प्रशासनाने शेवगाव शहरांमध्ये दामिनी पथकाची स्थापना करावी, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना न्याय द्यावा, नाहीतर ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळा सोडण्याची वेळ येईल, तसेच शेवगांव शहरामधील क्लासेसला जाणार्‍या विद्यार्थिनींना देखील या रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील पालकांनीदेखील दक्ष राहून आपल्या पाल्याची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीसांनी विशेष खबरदारी न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर आज शाळा सोडण्याची वेळ आली आहे, तरी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी या गोष्टीकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी पालक करतांना दिसत आहेत.