Breaking News

विखे फाऊण्डेशनच्या विद्यार्थ्यांनी, माणूसकीला दिला मदतीचा हात!


पाथर्डी/शहर प्रतिनिधी/- पाथर्डी शहरात, ज्योती शर्मा व अनुराधा फुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या, 'जगू या थोडं माणूसकीसाठी' या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद देताना, शेवगांव येथील विखे फाऊण्डेशनच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रत्येकी एक ड्रेस देऊन मदतीचा हात दिला.

विखे फाउण्डेशनचे कार्यकारी संचालक, युवराज नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मिळालेले कपडे पाथर्डीला आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश बोरुडे यांनी स्वखर्चाने वाहन उपलब्ध करुन दिले.सुखवस्तू समाजाच्या दृष्टीने टाकाऊ ठरत असलेल्या जीवनोपयोगी वस्तू मागास समाजातील गरजूपर्यंत पोहचविण्याचा दुवा म्हणून काम करत असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आजवर कित्येक गरजूंना अशा वस्तू मिळाल्याने त्यांचे जीवन सुखकर बनले आहे. याचे बहुतांशी श्रेय या उपक्रमास वाहून घेतलेल्या, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शर्मा व अनुराधा फुंदे यांना जाते. त्यांना सहकार्य करणारेही अनेक हात आहेत. परंतु या हातांना सहाय्याभिमुख करण्याचे काम या दोघींच्या माध्यमातूनच होते. म्हणूनच त्यांचे शहराच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.