महाशिवरात्रीच्या पुर्व संध्येला दघ्नेश्वर शिवालयात सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह भाविकांसाठी एक पर्वणीच असुन भगवान शंकराची उपासना या काळात होत असते. देव, दैत्य यांच्या भक्तीला समान वागणूक देऊन भोळ्या मनाचे भगवान शंकर उपासनेत सर्वांची मनोकामना पूर्ण करतात. उपहासाने मनाची, शरीराची शुध्दी होते, त्यातूनच उपासना घडते, उपासनेतुनच भक्ताला फलसिद्धि होत असते असे प्रतिपादन देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगीरी महाराज यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील दघ्नेश्वर शिवालयात महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी दरम्यान उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना महाराज बोलत होते. यावेळी दघ्नेश्वर शिवालयाचे ह. भ. प. कृष्णदेव महाराज काळे, अशोक महाराज बोरुडे, देविदास महाराज म्हस्के, गणपत आहेर, नवनाथ म. काळे, जालिंदर म. मोहिते, अशोक म.थोरवे, नवनाथ म. गुंजाळ, काशिनाथ म. टेकाळे, साईनाथ म. जगदाळे, धोंडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनात दघ्नेश्वर शिवालयात आयोजित या सप्ताहाचे हे 10 वे वर्ष असून तपपुर्तीकडे वाटचाल सुरु असलेल्या या सप्ताहाचे यशस्वी आयोजन ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी करण्यात येते. आजच्या प्रवचन सेवेत हभप म्हस्के महाराज यांनी सांगितले की, मानवाने सर्व गुणसंपन्न असावे, उपवास मनाला शांती देतात, तर भगवंताच्या उपासनेतून शीतलता अंगी येते. चंदनासम वागणूक मानवाने इतर प्राण्यांना दिली पाहिजे. ती वागणूक देण्यासाठी स्वतःच्या अंगी चंदनासम शीतलता हा गुणधर्म असावा असे आपल्या विस्तृत प्रवचन सेवेत महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी एकादशीनिमित्त दानशूर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी दघ्नेश्वर सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांच्या नियोजनात सप्ताहास मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती.
दहिगाव-ने येथील दघ्नेश्वर शिवालयात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:30
Rating: 5