गडाख मुरकूटे समर्थकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी
याबाबत दिलेल्या निवेदनात संजय सुखधान यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गिडेगाव येथे कार्यक्रमात आमदार मुरकुटे यांनी गडाख हे सोनईतील भोकाडी असून जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत काळ्या नागाला छाटले. अशी टीका नाव न घेता केली होती. याचा निषेध म्हणून गडाख समर्थकांनी एकत्रितरित्या येऊन नेवासा नगरपंचायत चौकात दहशत तयार करून आमदार मुरकुटे यांच्या पुतळयाचे दहन करून घोषणाबाजी केली होती.
या नंतर काही तासातच आमदार मुरकुटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून आमदार मुरकुटे समर्थक ही आले. आणि गडाखांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले. या प्रकारामुळे संपूर्ण नेवासा शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले. कारण या अगोदर ही अशी परिस्थिती पहाता छोट्या मोठ्या कारणांवरून नेवासा शहरात याआधी दंगली घडलेल्या आहेत. याची झळ सर्वसामान्य नेवासकर व्यापाऱ्यांना बसली आहे. वरील घडलेल्या प्रकारामुळे शहरातील व्यापारी व नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने जे आपल्या आई वडिलांची काळजी घेत नाही, परंतू आपापल्या नेत्यांसाठी रस्त्यावर येऊन वातावरण दूषित करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करू पाहणाऱ्या दोन्ही ही समर्थकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
यावेळी पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनावर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान, नगरसेविका शालिनी सुखधान, काँग्रेस कमिटीचे सचिव संदीप बाबा क्षीरसागर, शरद चक्रनारायण, रमेश भालेराव, कैलास साळवे, मिरुभाऊ मकासरे, विलास शेटे, रमेश जाधव आदींच्या सह्या आहेत.
