Breaking News

गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही : ना. पंकजा मुंडे

पुणे : पीडित वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी मला काम करायचे आहे. उत्कृष्ट लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करणार आहे. लोकप्रतिनिधी घडविणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांवर मी अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी येथे केले.


दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त रहाटणी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समितीच्या वतीने ‘आठवणीतले मुंडे साहेब’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पायलट रमीला लटपटे, विजय वडमारे, अजिंक्य गायकवाड यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या मागे असणार्‍या सर्मथकांना बरोबर घेऊन नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची संधी दिली. त्यांच्याविषयी बोलताना अश्रू येऊ न देता फक्त भावना व्यक्त करायच्या याचे धाडस मला त्यांच्यामुळेच आल्याचे पंकजा यावेळी म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी कधीही भावनेचे राजकारण केले नाही, याशिवाय जे केले ते भावनेने केले. त्यांचे मित्र तर सदैव त्यांची आठवण काढतातच शिवाय शत्रुंना देखील त्यांची आठवण येते. असे अजातशत्रु त्यांनी बनवल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.भाजपने त्यांच्यावर अन्याय केला, असे म्हणणारे त्यांच्या मागचा वर्ग आपलासा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे मुंडे यावेळी म्हणाल्या.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीपुर्ण नातेसंबंध तसेच विलासराव देशमुख यांच्या बरोबरच्या त्यांच्या आठवणी यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या. मुंडे यांच्यामुळेच मला अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, सुंदरलालजी पटवा यांच्याबरोबर राहून शिकण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर अधिवेशनाला उपस्थित राहून, कार्यकर्त्यांच्या घरी पिठले भाकरी खाऊन मी घडले. माझ्या मुलीने मला निवडून आणले हे ते अभिमानाने राज्यभर सांगायचे. मुले-मुली असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. बारामतीत मी जेव्हा युवा मोर्चाची एल्गार सभा घेतली तेव्हा ती पाहण्यासाठी ते टीव्ही पुढे बसले आणि सभेला झालेली गर्दी पाहून माझे भाषण संपताच त्यांनी मला फोन करुन अभिनंदन केले. तरुणांना संधी देण्याचे त्यांचे धोरण होते. अशा अनेक आठवणी पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितल्या. गोपीनाथ मुंडे माझ्या जीवनात आले नसते तर मी खासदार झालो नसतो. दिल्लीत माझी ओळख गोपीनाथ मुंडेचा माणूस म्हणूनच आहे. सत्ता असो अथवा नसो दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगत खासदार अमर साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.