Breaking News

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत जोडा, सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो ही निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पुणे मेट्रो ही निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी करत ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह वि विध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्यावतीने मागील 2 वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली आहे. यात अडथळे आल्यानंतर पिंपरी चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. 


पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ’पीसीसीएफ’च्या मिस कॉल मोहिमेस शहरातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार्‍या पत्रावर 683 नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. तसेच लाक्षणिक उपोषण स्थळावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून आपल्या फेसबुक अकाउंट तसेच सोशल मीडियावर फोटो अपलोड करून या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. मेट्रोची सुविधा ही नागरिकांच्या सेवेकरता असल्याने नागरिकांची मते जाणून घ्यायला हवीत, अशी अपेक्षा उपोषणकर्ते व संघटनांनी व्यक्त केली आहे. 
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेता एकनाथ पवार म्हणाले, की तत्कालीन सत्ताधार्‍यांनी पिंपरीपर्यंतच डीपीआर तयार केला असल्याने हा अडथळा येत आहे. महापालिकेने पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच ते काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेच विविध स्तरांवर चर्चा व मंजुरी घेऊन प हिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत जाईल, असा त्यांनी विश्‍वास व्यक्त केला.निधीची कमतरता नसून मेट्रोसाठी लागणारा निधी महापालिका भरण्यास तयार आहे, असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेता एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले आहे.