Breaking News

वेगळ्या विदर्भाला मुख्यमंत्र्यांच्या वाटाण्याच्या अक्षता -आमदार डॉ. आशिष देशमुख यांची टीका

बुलडाणा,(प्रतिनिधी): स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याच्या आपल्या आग्रहाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून, विषय डावलण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारने चालवला असल्याचा आरोप काटोलचे भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. डॉ. देशमुख यांनी 6 डिसेंबर 2017 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध असल्यामुळे व स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा भाजपाच्या बांधिलकीचा विषय असल्यामुळे हा विषय मुख्यमंत्र्यांनीच पुढे न्यावा आणि त्यासाठी नेतृत्व करावे, अशी मागणी या पत्रातून डॉ. देशमुख यांनी केली होती.

विदर्भाच्या विकासासंबंधीचे अनेक मुद्दे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या समर्थनार्थ मी त्या पत्रात मांडले होते. मुख्य मागणी वेगळ्या विदर्भाची, वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी दि ल्लीतील नेत्यांकडे शिष्टाई करण्याची होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी पार वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे स्पष्ट करून डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे, की सामान्य प्रशासन विभागाचे या विषयावरील विनोदी स्वरुपाचे पत्र मला प्राप्त झाले आहे. ॠस्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करमे तसेच इतर विविध मागण्याॠ असा हास्यास्पद सरकारी शीर्षकी विनोद या पत्रांमध्ये करण्यात आला आहे. आपल्या पत्रातील मागण्या या विविध विभागांशी संबंधित असल्यामुळे आपल्या पत्राची प्रत त्या विभागांना पाठवण्यात आल्याचे मला औपचारिक रीत्या कळवण्यात आले आहे. जलसंपदा, सहकार व पणन, कृषी व पदुम, उद्योग, ऊर्जा, ग्रामविकास, सामान्य प्रशासन, वित्त, कौशल्य विकास, नगर विकास, गृह विभागांचा त्यात समावेश आहे. हा केवळ वेगळ्या विदर्भाची मागणी डावलण्याचा प्रकार आहे. तसेच हा शब्द फिरवण्याचाही प्रकार आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने आपल्या पक्षाची बांधिलकी असलेल्या विषयाची अशाप्रकारची हेटाळणी करणे शोभणारे नाही, असे डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.