Breaking News

पेटलेल्या झाडाची नागरिकांना धास्ती अपघाताची शक्यता ; झाड कापण्याची मागणी


कर्जत / प्रतिनिधी :- येथील भांडेवाडी मध्ये अक्काबाई मंदिरासमोरील मोठ्या चिंचेच्या झाडाने आतून पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या झाडाजवळच वीज वितरणच्या तारा असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील तीन दिवसांपासून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरीकांमधून बोलले जात आहे. 
हे झाड कर्जत-राशीन तसेच कर्जत-करमाळा या दोन मुख्य रस्त्यावरील ऐन चौकात असून या झाडाजवळून विजेच्या तारा आहेत. हे झाड आतून जळून खाली पडले तर या तारांसह रस्त्यावर पडेल व त्यामुळे मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी याबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकामच्या हद्दीत असलेल्या या धोकादायक झाडाला काळजी पूर्वक खाली घेणे आवश्यक आहे. सकाळी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना आमचे प्रतिनिधींनी दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता त्यांनी तातडीने कारवाई करत वीज वितरणची वीज बंद करून घेतली. काही वेळात सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांनी पाहणी करून लवकरात लवकर झाड उतरविण्याची कार्यवाही करणार असल्याचे सांगितले, तर नगर पंचायत समितीच्या विरोधी पक्ष नेत्या पूजा म्हेत्रे यांच्याच दारात हे झाड असल्याने त्यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी बोलावून झाडाच्या खोडात पाणी मारून आग तात्पुरती विझवली. 

गेली तीन दिवसापासून या झाडाला आग लागत असून आम्ही ती विझवत असल्याचे सांगून या झाडाला तोंडन्याची निविदाही मंजूर झाली आहे मात्र अद्यापि त्यावर कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाने तात्काळ हे झाड तोडावे अशी मागणी माजी उपसरपंच संतोष म्हेत्रे यांनी केली. तर सदरचे झाड मुद्दाम पेटवले जात असून ते कोण पेटवत आहे, ते परिसरातील सर्वाना माहिती आहे मात्र अशा पद्धतीने रस्त्यावरील जनतेच्या जीविताशी कोणीही खेळ करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी देऊन सदरच्या झाडातील आग विझविण्याचे काम कर्मचारी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.