Breaking News

जामखेडमध्ये भरदिवसा गोळीबार; डॉक्टर सह दोनजण जखमी निवडणुकीच्या पराभवातुन हल्ला झाल्याचा संशय

जामखेड /ता. प्रतिनिधी :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामखेडमध्ये दु. 12 वा पंचायत समिती कार्यालयासमोर भर रस्त्यावर झालेल्या गोळीबारात शहरातील डॉ. सादिक जानमोहम्मद पठाण (जामखेड) आणि कय्युम सुलेमान शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरकडे हलविण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी डॉ. सादिक पठाण यांच्या वडीलांवर पाटोदा येथे हल्ला करून जखमी केल्याने त्यांनाही नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सादिक पठाण मुळ रा. नाळवंडी ता. पाटोदा जि. बीड हल्ली रा. जामखेड तसेच कय्युम सुलेमान शेख, मोहसीन रफिक पठाण, अकील सय्यद हे चौघेजण मारूती गाडीतून (एम.एच. 23 ई 4289) नगर रोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरून जात आसतांना समोरून येणार्‍या (एम एच 12 जे सी 6372) या स्कार्पिओ गाडीतून पाच सहाजण जणांनी येवून त्यांच्या दिशेने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी डॅा. सादिक पठाण व दूसरी गोळी कय्युम सूलेमान शेख या दोघांच्याही मांडीवर गोळी लागून दोघे गंभीर जखमी झाले. या वेळी आचानक झालेल्या गोळीबारात बाजूच्या नागरिकांची पळापळ झाली, दुतर्फा वाहने थांबल्याने गर्दी झाल्याने, हल्लेखोर यामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पगार सहकार्‍यांसह घटनास्थळी धावले. जखमी डॅा. सादिक पठाण यांना ग्रामीण रुग्णालयात तर कय्युम शेख यांना खाजगी रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने अहमदनगर रवाना केले आहे.

आरोपींनी डॉ. सादिक पठाण यांचे मूळ गाव नाळवंडी येथे डॉक्टरांचे वडीलांसह भावालाही मारहाण करून जखमी केले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे जामखेडला रवाना झाले, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करून आरोपींना लवकरच अटक करू असे मुंडे यांनी सांगितले. ते जामखेड येथे अनेक महिन्यांपासून प्रभारी आधिकारी असून जामखेड सारख्या संवेदनशील तालुक्याला कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कायम सक्षम अधिकारी पाहिजे, या विषयावर उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी बोलण्याचे टाळले. अहमदनगर येथून ठसे तज्ञ अधिकारी संगिता धुमाळ, हे. कॉ. सुभाष सोनवणे, संतोष आरु घटनास्थळी पोहचुन पुढिल तपास करीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक नितीन पगार यांचे दोन पथक, एलसीबी अहमदनगर यांचे दोन पथक, कर्जत उपविभागीय अधिकारी यांचे एक पथक रवाना होऊन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी दिली आहे.

पाच दिवसांपुर्वी पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीसांना निवेदन देऊनही दखल नाही. 
पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रतिस्पर्धीकडून सतत वाद घातला जात होता. यामुळे जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या डॉ. सादिक पठाण यांचे बंधू डॉ. इकबाल पठाण यांनी बीड पोलीस अधीक्षक व अमळनेर पोलिसांना सबंधीत आरोपीकडून आपल्या कुटुंबाच्या जीवास धोका असून यासंदर्भात लवकर कारवाई करावी अशी निवेदनद्वारे मागणी केली होती, पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर जामखेडमधील गोळीबार व वडिलांवरील हल्ला टळला असता, बीड पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच जामखेडला गोळीबार झाला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.