घोड व कुकडीचे आवर्तन सोडा - माजी मंत्री पाचपुते
पाचपुते यांनी पत्रात म्हटले की, लाभधारक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गहू, कांदा, मका, हरभरा, इत्यादी पिकांसह इतरही काही चारापिके केलेली आहेत. या उभ्या असलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळणेसाठी कुकडी प्रकल्प व विसापूर धरणातून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन दि.२० फेबु.२०१८ च्या दरम्यान तसेच घोड धरणातून दुसरे आवर्तन दि.२८ फेबु. २०१८ च्या दरम्यान सोडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. पाचपुते पत्रात पुढे म्हणाले की, आवर्तन लवकर सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर तारखेपर्यंत आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पातुन चार रोटेशन देण्याचे ठरले असून त्यापैकी एक रोटेशन पूर्ण झालेले आहे. आणखी तीन रोटेशन बाकी असून सद्यस्थितीत २० तारखेपर्यंत दुसरे आवर्तन सोडणे गरजेचे आहे. तर तिसरे आवर्तन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस व चौथे आवर्तन २० मे च्या दरम्यान सोडावे. असा निर्णय झालेला असताना त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री पाचपुते यांनी व्यक्त केले.
