Breaking News

अग्रलेख - देशाभिमान विकून परदेशात स्थायिक होणारे भारतीय...


भारतातून परदेशात स्थायिक होणार्‍या अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या वाढत आहे. यामागे नेमके कोणती कारणे आहेत, यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. भारत माझा देश आहे, असे आपण मोठया अभिमानाने शाळेत प्रतिज्ञा म्हणत असलो, तरी कालांतराने आर्थिक सुबत्ता असतांना देखील हा देश आपल्याला आपला का वाटत नाही. का भारतीय नागरिकत्वाला तिलांजली देत, इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारण्यावर भर देण्यात येत आहे. 2017 या एका वर्षांत तब्बल 7 हजार नागरिक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशात स्थायिक होत आहे. भारतात अतिश्रीमंत असणार्‍या व्यक्तींचे प्रमाण कमी आहे, आणि याच व्यक्ती देश सोडून परदेशात स्थायिक होत आहे. ज्यामुळे भारतातील मोठया प्रमाणातील पैसा परदेशात स्थलांतरित होत आहे. यावर कुठेतरी लगाम घालण्याची गरज आहे. मात्र सरकारच्या उदासिन धोरणांमुळे या वर्गात नाराजी पसरत चालली आहे. 
भारतातील व्यक्ती परदेशात गेल्यानंतर तरूण वयातच यशस्वी होतांत असा समज या लोकांमध्ये दृढ होतांना दिसून येत आहे. परदेशात हेच भारतीय व्यक्ती शिस्त व स्वच्छता याचे पालन करतांना दिसून येतात. कारण तेथील नियम, कायदे हे कठोर आहेत. आपल्या देशांची प्रतिमा जागतिक पटलावर मलिन होणार नाही, याची पूर्ण काळती तेथील शासन आणि प्रशासन घेते. तेथील देशात राष्ट्रभिमान प्रत्येक नागरिकांत भिनवला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागतो. याउलट आपल्या देशात आजही हागणदारीमुक्ततेसाठी आवाहन करावे लागते, शौचालय वापरासाठी लोकांत जनजागृती करावी लागते, जातीपातीच्या भिंती आजही मजबूत आहे. लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, हे देशाचे वास्तव आहे. आजही आपल्या मनपटलांवर जागतिक स्तरावर समृध्द होण्यासाठी आपण प्रयत्न करतांना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक जण आपल्या देशांतील कायद्यांना नावे  ठेवत नाके मुरडतांना दिसून येतात. मात्र कायद्यांचा अभ्यास केल्यास आपल्याकडील कायदे अतिशय भक्कम स्वरूपात आहेत. मात्र प्रशासकीय आणि शासकीय उदासिनतेमुळे त्याची पुरेपूर अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. इथल्या अल्पसंख्याक आणि बहूतांशी मुस्लिम समुदायांना आपण आपल्या देशांत आजही सुरक्षित असल्याचे वाटत नाही. त्यामुळे परदेशात जाणारे भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. 2017 या वर्षांत 7 हजार अतिश्रींमत व्यक्ती भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. हे प्रमाण गेल्यावर्षींच्या तुलनेत वाढले असून ही देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब ठरू शकते असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या अहवालातून समोर आली आहे. भारत सोडून गेलेले हे अतिश्रीमंत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांत स्थलांतर करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या माहितीनुसार भारतात सध्याच्या घडीला 33 लाख 400 अतिश्रीमंत व्यक्ती आहेत तर 20 हजार 730 हून अधिक लोकांची संपत्ती ही अब्जावधींच्या घरात आहे. भारतातून 2016 मध्ये सहा हजार अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात स्थायिक झाले, ही संख्या 2015 मध्ये चार हजार होती. भारतातून जरी अतिश्रीमंत व्यक्ती स्थायिक होत असले तरी देशासाठी ही चिंतेची बाब नसल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षांचा आढावा घेतल्यास 2000-2014 या कालावधीदरम्यान तब्बल 61 हजार कोट्याधीशा भारत सोडून परदेशात गेले. दरवर्षी जवळपास हजार व्यक्ती आपल्या नागरिकत्वाचा त्याग करून देश सोडून जातांना दिसून येत आहे. परदेशात स्थायिक होणारे नागरिक , यांच्या समाजिक भानांबद्दल देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. देशात करोडो भारतीय अन्न, वस्त्र, निवारा यापासून वंचित आहे. जातीभेदाचे चटके सहन करत आहे. योग्य  शिक्षण, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा त्यांना मिळत नाही, तरी ते देश सोडून जाण्याची भाषा करत नाही, कारण त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही. याउलट परेदशात स्थायिक होणार्‍या भारतियांना याची कसलीही झळ पोहचत नाही. तरीही ते आपला देशाभिमान गहाण ठेवून देश सोडून जात आहे. यावर कुठेतरी विचारमंथन होऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे.