Breaking News

तरुणांनी पुरक कौशल्ये विकसीत करावी- डॉ. एन. रामस्वामी


रोजगारासाठी चाकोरीबध्द शिक्षणासोबतच अतिरिक्त कौशल्य महत्वाचे ठरते. त्यामुळे तरुणांनी पुरक कौशल्य विकसीत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई मनपा आयुक्त डॉ. एन. रामस्वामी यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उप जिविका अभियान नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे येथे आयोजित ‘रोजगार मेळावा आणि लाभार्थी नोंदणी अभियान’ प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद साधत होते. 


याप्रसंगी उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते काही तरूणांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात रोजगार मेळाव्याला अडीच हजाराहून अधिक युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच आज ज्यांची निवड होणार नाही त्यांनी निराश न होता स्वत:मधील कमतरतेचा शोध घेऊन अंगभूत क्षमतांचा विकास करावा असे सांगितले. भविष्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राजवळ येणारे विमानतळ, सेवा क्षेत्रांमध्ये होणारी वाढ, आरोग्य सेवांची वृध्दी अशा विविध बाबी लक्षात घेऊन त्यासाठी पूरक कौशल्य प्रशिक्षण युवक-युवतींना उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.