Breaking News

‘महाराष्ट्राशी राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यासाठी रशिया उत्सुक’ : निकोलाई कुदाशेव

भारत – रशिया संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून रशिया भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक असल्याचे प्रतिपादन रशियाचे भारतातील राजदूत निकोलाई कुदाशेव यांनी आज येथे केले.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या कुदाशेव यांनी आज (दि. १९) राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली रशियाला भेट दिल्याचे सांगून रशियातील जलव्यवस्थापन कंपनी राज्यातील मिठी नदीसह अन्य नद्यांच्या शुद्धीकरणासाठी तंत्रज्ञान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात रशियन बँक, रशियन निर्यात केंद्र तसेच रशियातील हिऱ्यांच्या व्यापाराची कंपनी ‘अलरोसा’ मुंबईत कार्यालय उघडणार आहे. याशिवाय रशिया –भारतासोबत संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याबाबत चर्चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१८ हे वर्ष भारत आणि रशिया ‘पर्यटन वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.