Breaking News

राज्यात जोरदार पावसाची शक्यता


पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्नाटक, अरबी समुद्र ते मालदीव या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा परिणाम राज्यांतील तापमानवर झाला आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागांत ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. सध्या मध्य प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे चीवर; तसेच कोकण, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका, उत्तरेकडील पंजाब, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. त्याचप्रमाणे मालदीवचा परिसर ते अरबी समुद्र आणि कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला असून, पुढील चार दिवस राज्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यात दि. 11 आणि दि. 12 रोजी राज्यात गारपीट होणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. कोकणात चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच, उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर, पश्‍चिम बंगाल, उत्तर पाकिस्तान, हिमालय या भागातही चक्राकार वार्‍यांची स्थिती तयार झाली आहे. पंजाब व हरियाणाच्या परिसरातही चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. शुक्रवारी (ता. 9) सकाळी मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 8.0 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. गेले दोन दिवस आकाश निरभ्र होते. येत्या मंगळवारपर्यंत (ता. 13) राज्यात ढगाळ हवामान राहणार असून, रविवारी (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. 12) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल, तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल. मंगळवारी (ता. 13) मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.