Breaking News

श्रीदेवीच्या एक्झीटने सिनेसृष्टी हळहळली अभिनेत्री श्रीदेवी यांचे यूएईमध्ये निधन

मुंबई : अभिनय आणि नृत्याने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे यूएईमध्ये निधन झाले. कार्डिअ‍ॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अकाली घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या पश्‍चात पती बोनी क पूर, मुली खुशी आणि जान्हवी असा परिवार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेले होते. शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती. हॉटेल जुमैरातील स्वतःच्या रुममध्ये असताना श्रीदेवी यांना त्रास जाणवायला लागला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्या बाथरुममध्येच पडल्या. हॉस्पिटमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानले जाते. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटस ृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती. वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.
सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. ‘मॉम’ हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाचे शूटिंग त्या करत होत्या. रिअल लाईफमधला दीर, अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश यशस्वी चित्रपटांची निर्मिती पती बोनी कपूर यांनी केली आहे. अभिनेते संजय क पूरही त्यांचे दीर आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून पदार्पण करणार होती. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला.