Breaking News

व्हॉलीबॉलच्या सामन्यांत ‘संजीवनी’ प्रथम


कोपरगांव : प्रतिनिधी :- येथील इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस् असोसिएशनमार्फत संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा विभागीय पातळीवरील व्हाॅलीबाॅल सामन्यांमध्ये संजीवनीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. बास्केटबाॅल विभागीय सामन्यांमध्ये संजीवनीच्या संघाने दुसरा क्रमांक मिळविला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही ‘संजीवनी’ आघाडीवर असल्याचे यातून स्पष्ट झाले, असे प्रतिपादन प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी केले. 
व्हाॅलीबाॅल व बास्केटबाॅल या दोन्हीही सामन्यांचे उदघाटन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य मिरीकर बोलत होते. व्हाॅलीबाॅल सामन्यांमध्ये संजीवनीच्या संघाचे प्रवरानगरच्या संघावर पहिल्या सेट मध्ये २५-१३ अशा गुणांनी तर दुसऱ्या सेट मध्ये २५-१५ अशा गुणांनी मात करीत प्रथम विजेतेपद मिळविले. हा संघ राज्य पातळीवर खेळण्यासाठी जाणार आहे. या संघात कर्णधार आकाश शेटे, शंतनू देवकर व सागर सदाफळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बास्केटबाॅल संघाने दुसरा क्रमांक मिळविला. या संघात कुणाल माने व विक्रांत डोंगरे यांनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दोनही संघांचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक बाजीराव शिंदे, गणेश नरोडे, अनिरूध्द जोशी, योगेश आव्हाड यांनी पुढाकार घेतला.