Breaking News

विनापरवाना खोदाई करणा-या मोबाईल कंपनीला पालिकेची नोटीस

पुणे, दि. 03, फेब्रुवारी - दिघी परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिका व क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी न घेता रस्ते खोदाई करून फायबल केबल टाकल्याप्रकरणी ’ई’ क्षेत्रीय कार्यालयाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीस नोटीस पाठविली आहे. महापालिका व क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी न घेता रिलायन्स जिओ कंपनीने भारतमातानगर, दिघी परिसरात रस्ते खोदाई करीत भूमिगत फायबर केबल टाकण्याचे काम केले. हे काम नोव्हेंबर महिन्यात केले गेले. या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयातील काही अधिका-यांनी मदत केल्याची तक्रार करण्यात आली आहे. 


कंपनीने विनापरवाना रस्ते खोदाई करून फायबर केबल टाकल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. तसेच, लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्याची दखल घेत, रिलायन्स जिओ कंपनीस नोटीस पाठविली आहे. रस्ते खोदाई करू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे क ार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.