Breaking News

जिल्ह्यात तंबाखू विरोधी मोहिम तीव्र करा - उपजिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, फेब्रुवारी - जिल्ह्यामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनक आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंबाखू विरोधी मोहिम तीव्र करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. तसेच यामध्ये दंडात्मक कारवाईवर भर द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय अंमलबजावणी पथकाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर तंबाखू नियंत्रणाचे कार्य महत्वाचे आहे. 


त्यामुळे ही ठिकाणे तंबाखू मुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार्‍या व्यक्तीकडून दंड वसूल केला जावा अशा सूचना जोशी यांनी दिल्या. तसेच पथनाट्य, एनएसएस कॅ म्प यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच सर्व सरकारी कार्यालयांमध्येही दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जोशी यांनी दिल्या. लोकांमध्ये तंबाखू सेवन चुकीचे आहे याची जाणिव निर्माण व्हावी यासाठी दंडात्मक कारवाई गरजेची असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये तंबाखू सेवनाची समस्या मोठी असून, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची दंत चिकीत्सा तसेच तंबाखू सेवना विषयीची तपासणी केली जात असल्याचे सांगितले. तर कामगार कल्याण विभागाकडे याविषयी पाठपुरावा करण्याची सूचना अशासकीय सदस्यांनी केली. या विभागाचा क ामगारांशी जवळचा संबंध येतो. तसेच तंबाखू सेवनाचे प्रमाण कामगार वर्गामध्ये जास्त असल्याचे सांगतानाच, त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कामगार विभाग जास्त मोलाचे कार्य करू शक तो असे अशासकीय सदस्यांनी सांगितले.