शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी (सुलतानपुर) सह दहिगाव ने येथील काही वाड्या वस्तीवर मागील दीड महिन्यापासून अक्षय प्रकाश योजना बंद असून तब्बल 14-16 तास भारनियमन सुरू आहे. परिसरातील विज ग्राहकांना विज वितरण व्यवस्थापनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी या गावाला शहरटाकळी आंत्रे येथील सबस्टेशनवरून विज वितरण केले जाते. काही दिवसांपूर्वी सबस्टेशनवरील यांत्रिक बिघाड झाल्याने मठाचीवाडी परीसरात सिंगल फेज (अक्षय प्रकाश योजना ) योजना बंद असुन फक्त थ्री फेज सल्पाय सुरू आहे. थ्री फेजचा वीज पुरवठा फक्त 8-10 तास राहत असुन नंतर भारनियमन केले जाते. आता सुरू असलेल्या 10-12 वी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा रात्रीचा अभ्यास करता येत नाही. शालेय विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षा काळात शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार असलेल्या विजवितरण व्यवस्था मात्र यावर उपाययोजना करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. सिंगल फेज योजना बंद असल्याबाबद सबस्टेशनवर विचारणा करणार्या ग्राहकांना कर्मचार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याची चर्चा आहे. नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना सध्या करावा लागत असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मठाचीवाडी परीसरात अक्षय प्रकाश योजना बंद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5