Breaking News

धनगर आरक्षण अहवाल अंतिम टप्प्यात : आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी शासन प्रयत्नशील - जलसंधारण मंत्री राम शिंदे


धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेमार्फत राज्य शासनाने सर्वेक्षण केलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण कोर्टात टिकून त्याचा लाभ धनगर समाजाला मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती मृद व जनसंधारण, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
धनगर साहित्य परिषदेमार्फत लातूर येथे आयोजित दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात जलसंधारणमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती संगीता धायगुडे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, ॲड. अण्णाराव पाटील उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले की, धनगर जाती आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करुन त्या प्रवर्गाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा धनगर आरक्षणाबाबतचा सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्यात आहे.

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव न्यायालयात टिकला पाहिजे या दृष्टीने शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतच्या निर्णयाला मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली असून धनगर आरक्षण व सोलापूर विद्यापीठाचे नामकरणाबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजात वैचारिक जागृती निर्माण होऊन त्याचा एक दबाव गट निर्माण झाला पाहिजे. त्याप्रमाणेच समाजातील समस्यांवर येथे चर्चा होऊन त्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कर्नाटक राज्यातील धनगर समाजाच्या संघटनेप्रमाणे राज्यात संघटना उभी राहिली पाहिजे, असे प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंधारणाबाबत तसेच साहित्य व कला संवर्धनाबाबत सुमारे 200 वर्षापूर्वी फार मोठे काम केलेले असून आज ह्या संमेलनाच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.