Breaking News

दखल - देश घटनेवर चालतो, की श्रद्धेवर?


भारताच्या राज्यघटनेत विज्ञानवादी दृष्टिकोनाचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असले, तरी देशात श्रद्धांच्या नावाखाली अंधश्रद्धांचा धुमाकूळ सुरू आहे. मागे राजस्थानमध्ये महिलांचे के स कापण्याच्या घटना घडल्यामुळं वादंग निर्माण झाला होता. विनोबा भावे यांच्यावर अध्यात्माचा पˆभाव होता, तरीही विज्ञानाची महत्ती त्यांना माहीत होती. दिल्लीला जायचे असेल, तर त्याच गाडीत बसलं पाहिजे. चेन्नईला जाणार्‍या गाडीत बसलं आणि कितीही पूजा, अर्चा केली, तर गाडी दिल्लीला जाणार नाही, असं त्यांनी एकेठिकाणी म्हटलं होतं.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू विज्ञानवादी होते. त्यांनी पहिल्या पंचवार्षिकपासून विज्ञानवादी दृष्टिकोनातून अनेक योजना राबविल्या. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं वैज्ञानिक उपक्रमाचे उद्घाटन करतात आणि दुसरीकडं त्याचवेळी धार्मिक उदाहरणं देऊन हे आपल्या पुराणात पूर्वीचं होतं, असं सांगून वैज्ञानिकांच्या कामगिरीला गौण लेखतात. समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारेही पूजा, अर्चेत रमतात. त्यांच्यावरही अंधश्रद्धांचा प्रभाव असतो. तेव्हा हसावं की रडावं असा प्रश्‍न पडतो. पुरोगामी म्हण विर्‍यांचीही याबाबतीत बर्‍याचदा दुटप्पी वागतात. हिंदीभाषक राज्यांत तर अंधश्रद्धांचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रानं अंधश्रद्धाविरोधी कायदा केला असला, तरी त्यासाठी अंधश्रद्धांनी त्याअगोदर कितीतरी बळी घेतले गेले. मुख्यतः आमदार, खासदार हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. त्यांनी तरी किमान अंधश्रद्धांपासून दूर राहायला हवे; परंतु बहुतांश कार्यक्रमाची भूमिपूजनं श्रीफळ वाढवून, पूजा घालून केली जातात. तिथं त्यांनी राज्यघटनेची बांधिलकी पाळण्याची शपथ कुठं जाते, हा प्रश्‍न निर्माण होतो. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या मुलानं भूतबाधेमुळं सरकारी बंगला खाली केला. यापूर्वी बर्‍याच आमदार, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या, राहत्या बंगल्याच्या व्यवस्थेत बुवा, बाबांनी सां गितल्याप्रमाणं बदल केले आहेत. चार भिंतीच्या आत धर्म असला, तर बिघडत नाही; परंतु तो व्यापक प्रमाणावर रस्त्यावर आणला जातो, तेव्हा मात्र त्याचं अंधानुकरण होतं. आता राजस्थानमधील आमदारांनाही चक्क भुताचा धसका घेतला आहे; पण भूतबाधा सरकारी निवासस्थानाला झाली नसून राज्याच्या विधानसभेलाच झाली आहे, असं या आमदारांचं म्हणणे आहे. काही आमदारांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेऊन भूतबाधेची शक्यता बोलून दाखवली आहे. यावर कळस म्हणजे गुरुवारी विधानसभेच्या आवारात तंत्रविद्येची माहिती असलेला एक पुजारी पूजाअर्चा करताना दिसला आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यावर काही सामाजिक संघटनांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थानमधील भाजपचे आमदार कल्याणसिंह चौधरी यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. ते पˆदीर्घ काळापासून आजारी होते. यानंतर राजस्थानच्या विधीमंडळ परिसरातील ‘भूत’ पुन्हा एकदा बाटलीबाहेर आले. आमदारांमध्ये पुन्हा एकदा भूतबाधेची चर्चा सुरू झाली. विधानसभेत दोनशे आमदार असून नवीन वास्तूत आजवर एकाही अधिवेशनात सर्वंच्या सर्व आमदार कधीच उपस्थित राहू शकले नाही. कधी आमदाराचं निधन झालं, तर कधी एखादा आमदार तुरुंगात होता, याकडं आमदारांनी लक्ष वेधलं. राजस्थानमधील विधीमंडळ सवाई मानसिंग स्टेडियमजवळील 17 एकर जागेवर बांधण्यात आलं आहे. 1994 ते 2001 या कालावधीत विधिमंडळाच्या नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात आलं. त्यापूर्वी वि धिमंडळाचे कामकाज जयपूर शहरातील सवाई मानसिंग टाऊन हॉलमध्ये व्हायचं. नवीन विधिमंडळापासून काही अंतरावर स्मशानभूमी आहे. भाजपचे आमदार नागौर हबिबूर रहमान यांनी सांगितलं, की नवीन विधिमंडळाच्या जागेवर अगोदर स्मशानभूमी होती. या ठिकाणी पूर्वी लहान मुलांच्या पार्थिवाला दफन करण्यात आलं होतं. अशा ठिकाणी आत्मा फिरत असतात, असं त्यांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांनी नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. या जागेवर आधी स्मशानभूमी होती. त्यामुळं या परिसरात एखादं मंदिर बांधण्याची शिफारसही करण्यात आली होती, असं त्यांनी नमूद केलं. पाच वेळा आमदार राहिलेले रहमान पुढं म्हणतात, ‘वसुंधरा राजे यांनी बुधवारी आम्हाला आमदारांच्या निधनाबाबत विचारणा केली. हे असे अचानक मृत्यू का होत आहेत, असा त्यांचा प्रश्‍न होता. मी त्यांना या ठिकाणी एखादा यज्ञ करावा किं वा मौलानाकडून वास्तूचं शुद्धीकरण करावं, असं सांगितले. एखाद्या चुकीच्या जागेवर तुम्ही वास्तू बांधली, तर त्या जागेवर पूजाअर्चा करून वाईट आत्म्यांना लांब ठेवता येतं, अशी सर्वांचीच धारणा असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरुवारी विधानसभेच्या आवारात एक पुजारी पूजा अर्चना करताना दिसला. याबाबत सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. कल्याणसिंह चौधरी यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं, तर गेल्या वर्षी मंडलगडच्या आमदार किर्ती कुमारी यांचं निधन झालं. त्यापूर्वी बसपचे आमदार बी.एल. कु शवाह यांना हत्येप्रकरणी तुरुंगवास झाला. गेल्या विधानसभेत काँगˆेस आमदार महिपाल मदेरना, मलखानसिंह बिश्‍नोई, बाबूलाल नगर यांना हत्या व बलात्काराच्या आरोपांमध्ये तुरुंगवास झाला होता. या सर्व घटना पाहता ते एकतर अपघात होते किंवा आमदारांनी गुन्हे केले होते. त्यामुळं त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यांच्या अपघाताशी किंवा गुन्ह्याशी वास्तू कुठं बांधली, याचा संबंध येत नाही. शिवाय गेल्या 17 वर्षांत या इमारतीमुळं काहीच झालं नाही. आताच आमदारांबाबत अशा घटना घडतात का, असा सवाल उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं दिसतं. खरं तर अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधात कायदा देशभरात होण्याची आवश्यकता आहे.