Breaking News

नाशिक जिल्ह्यात 89 केंद्रावर 12 वीची परीक्षा

नाशिक, दि. 20, फेब्रुवारी - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. सुमारे महिनाभर चालणारी ही परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी मंडळाने नियमावलीत काही बदल केले आहेत, त्यानुसार यंदाची परीक्षा पार पडणार आहे. नाशिक विभागातुन या परिक्षेसाठी 1 लाख 68 हजार 220 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. जिल्ह्यातील 89 केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. 


राज्यभरात दरवर्षी साधारण 13 ते 15 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसतात. राज्यभरात सुमारे दहा हजार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडते. विभागात 1 लाख 68 हजार 220 विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ठ झाले असून यात 97 हजार 249 मुले, 70 हजार 971 मुलींचा सामावेश आहेत.तर 1 लाख 60 हजार 660 नियमित परिक्षार्थी, 75 हजार 60 पुर्नपरिक्षार्थी तर 6 हजार 787 खाजगी परिक्षार्थींचा सामावेश आहे. मागील काही परीक्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या प्रश्‍नपत्रिका व्हॉट्सपवरून व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर भरारी पथकांची संख्या वाढवून, संवेदनशील केंद्रांवर कॅमेरे बसवूनही गैरप्रकारांची संख्या काही कमी झाली नव्हती. त्यामुळे बोर्डाच्या कार्यपद्धतीवर टीका झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होणारया परिक्षेसाठी फिरत्या पथकांची संख्या वाढविण्यात आली असून संवेदनशील परिक्षा केंद्रांत बदल करण्यात येवून ते केंद्र स्थलांतरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्‍नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका हॉलमध्ये ते गठ्ठे फोडले जायचे. त्याठिकाणी परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्‍नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यंदापासून केंद्र संचालक हे प्रश्‍नपत्रिकांचे सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिकांचे ते सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जातील.