Breaking News

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी होणे आवश्यक - आ. नितेश राणे


सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. या महापुरुषाची जयंती सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच साजरी होणे आवश्यक आहे. तिथी आणि तारखेचा घोळ करून वेगवेगळ्या साजर्‍या होणार्‍या शिवजयंत्या चुकीच्या आहेत. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार्‍यानी हिम्मत असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुरू गोविंद सिंग या महापुरुषांच्या जयंत्या तिथीप्रमाणे साजर्‍या करून दाखवाव्यात, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवजयंती कार्यक्रमानंतर बोलताना दिले. शिवरायांनी निर्माण केलेले गडकिल्ले हा आपला अमूल्य ठेवा आहे. या पवित्र ठिकाणांचा अनादर करणार्‍यांना ठेचून काढा, अशा शब्दांत किल्ले शिवनेरीवर रविवारी उघड झालेल्या वनविभागाच्या दारू पार्टीचा त्यांनी समाचार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर 200 वर्षांपूर्वी राजाराम महाराजांनी शिवजयंती सुरू केली होती. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतरही येथे शिवजयंती साजरी होत असे. मात्र यामध्ये गेल्या काही दशकांपासून खंड पडला होता. या पार्श्‍वभूमीवर आमदार नितेश राणे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या पुढाक ारातून अखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज सोमवारी 19 फेब्रुवारीला पुन्हा एकदा शिवजयंती उत्सव सुरू करण्यात आला. यावेळी नितेश राणे यांच्या हस्ते शिवरायांच्या हस्त आणि पदचिन्हाची हुबेहूब प्रतिकृती, महाराजांची पंचधातूची उत्सव मूर्ती आणि जिरेटोप मंदिराला अर्पण करण्यात आला. या निमित्ताने किल्ल्यात कोल्हापूरच्या जय भवानी गोंधळी ग्रुपचा गोंधळाचा कार्यक्रम तसंच शिवामर्दानी आखाड्याचा मर्दानी खेळांचा कार्यक्रम झाला. 
यावेळी आ. राणे यांनी जो शिवरायांच्या नावाने राजकारण करतो, त्याला शिवप्रेमी म्हणायचे का ? असा सवाल करून महाराजांचा खोटा इतिहास सांगणार्‍याना आज महाराष्ट्र भूषण मिळत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही आमदार, खासदार असलो तरी सर्वप्रथम शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी आवश्यक परवानग्या पुरातत्व विभागाकडून मिळवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी किल्ल्यावरील शिवजयंतीचा इतिहास सांगून मराठ्यांच्या इतिहासात रायगड, राजगड नंतर सिंधुदुर्गचे नाव घेतले जात असल्याचे सांगितले. नितेश राणे यांच्या प्रेरणेतून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पुन्हा एकदा शिवजयंती सुरू होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.