Breaking News

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ!


मुंबई : राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, येत्या एक-दोन दिवसांतच तो जाहीर केला जाईल. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 100 कोटीचा बोजा पडणार आहे. 1 जुलै, 2017 पासून ही वाढ लागू होणार आहे. राज्य सरकारच्या 19 लाख कार्यरत आणि निवृत्त अधिकारी-कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळेल. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वर्षातून दोनदा म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 136 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणार्‍या वाढीव भत्त्यानुसार आता सरकारी कर्मचार्‍यांना 140 टक्के महागाई भत्ता मिळेल. म्हणजे 4 टक्के वाढवण्यात आलाय. यामुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा सुमारे 100 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याबाबतच्या निर्णयावर मुख्य सचिवांनी शिक्कामोर्तब केले असून, अर्थमंत्र्यांनीही त्यास संमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच येत्या एक-दोन दिवसांत हा निर्णय जाहीर होईल.
सध्या सरकारी कर्मचार्‍यांना पे बँड आणि ग्रेड पे याच्या 136 टक्के महागाई भत्ता मिळतो. 1 जानेवारी, 2017 पासून महागाई भत्त्यात झालेली वाढ ऑगस्ट, 2017मध्ये लागू झाली. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमधील थकबाकी अद्याप सरकारी कर्मचार्‍यांना मिळणे बाकी आहे. तसंच जुलै, 2017 पासूनच्या महागाई भत्त्याची वाढ ही चालू महिन्यात जाहीर होणार असल्यामुळे मागील आठ महिन्यांचीही थकबाकी द्यावी लागणार आहे. ही थकबाकीच सुमारे दोन हजार कोटी रुपयांची होणार आहे. सध्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ही थकबाकी देणे हे सरकारसमोर मोठेच आव्हान ठरणार आहे.