Breaking News

राजेवाडीत घरफोडी; 35 हजाराची रोकड लंपास !

तालुक्यातील राजेवाडी येथील अशोक सुर्यभान निबांळकर यांच्या घरी अज्ञात चोरटयाने घराचा दरवाजा उघडून 35 हजार रुपये चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली. त्यामुळे संपुर्ण परिसरात पुन्हा एकदा चोराच्या भितीने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दि. 23 च्या मध्यरात्रीनंतर करमाळा रोडवरील राजेवाडी या गावातील कुलदैवत नागनाथ मंदिराच्या पश्‍चिमेस राहत असणार्‍या अशोक सुर्यभान निबांळकर यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरटयांनी साधारण 35 हजार रुपये रकमेवर डल्ला मारला. यावेळी रात्री अशोक निबांळकर व पत्नी शाकुबाई निबांळकर हे दोघे झोपेत असताना हा प्रकार घडल्याचे समजते. रोजच्या दैनंदिन कामासाठी पहाटे घरमालक अशोक निबांळकर झोपेतून उठले असता त्यांना हा प्रकार समजला. त्यावेळी घरातील दोन ते तीन पेट्यांची उचकाउचक करून सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या निर्दनास आले. तसेच दोन दिवसापुर्वी पत्नीच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले 35 हजार रूपये गायब झालेले पाहिले. त्याचबरोबर पेटीत असणारे कागदपत्रेही महत्वाची कागदपत्रेही गायब झाल्याचे समजले. त्यानंतर शेजार्‍यांना घडलेली घटना सांगून पेट्या व इतर साहित्य शोधन्याचा प्रयत्न केला असता, काही अंतरावर असणार्‍या श्रीरंग कुमटकर यांच्या शेतात पेट्या अस्ताव्यस्त पडलेले सामान, कपडे आढळून आल्याने त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जामखेड पोलिस स्टेशनला फोन करून घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली. जामखेड पोलिस अंतर्गत नान्नज दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी विठ्ठल चव्हाण, पोलीस कॉ. गहिनीनाथ यादव, पोलीस कॅा. तागड घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याची सविस्तर माहिती घेऊन चोरीतील अज्ञात व्यक्तीवर जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली नान्नज पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण हे पुढील तपास करत आहेत. घडलेल्या घटनेमुळे राजेवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.