Breaking News

देऊर सोसायटीमध्ये 2 कोटींचा गैरव्यवहार; 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सातारा, दि. 20, फेब्रुवारी - देऊर (ता. कोरेगाव) विविध कार्यकारी सेवा सोसायटीत एकूण 2 कोटी 16 लाख 15 हजार 870 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी तत्कालीन सचिव, तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळ, तत्कालीन तीन बँक विकास अधिकारी, एक शाखा प्रमुख व तीन वैधानिक लेखापरीक्षक, अशा 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फेर लेखापरीक्षक आनंदराव काकासो कणसे यांनी वाठार स्थानक पोलीस ठाण्यात गैरव्यवहारप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देऊर विकास सेवा सोसायटीमध्ये 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2013 व 1 एप्रिल 2013 ते 23 ऑक्टोबर 2013, या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाला होता.त्याचे फेरलेखापरीक्षण क रण्यासाठी आनंदराव काकासो कणसे, प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था कोरेगाव यांची फेरलेखापरीक्षक म्हणून सातारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी नेमणूक केली होती. कणसे यांनी या कालावधीत झालेल्या व्यवहारांची तपासणी केली असता त्यांना गैरव्यवहार आढळून आला.
त्यामध्ये कणसे यांनी तत्कालीन सचिव विजय कोकणे यास आवश्यक माहिती व खुलासा मागितला असता त्याने कोणतेही सहकार्य केले नाही व खुलासाही दिला नाही. ही बाब विचारात घेऊन व उपलब्ध दप्तर व माहितीवरून फेरलेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये संस्थेच्या कोणत्याही सेवकास वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार दप्तर ठेवण्याचे ज्ञान नसल्याचे दिसून आले. कोकणे याने रोजकीर्दमध्ये बरेच व्यवहार खतावलेले नाहीत. संस्थेकडे असलेल्या संगणकामध्ये अनेक व्यवहारांच्या नोंदी करण्यात आल्या नाहीत. दप्तरात खाडाखोड करून अफरातफर केल्याचे दिसून आले. कर्ज खतावणीस बोगस नोंदी, हातावरील रोख शिलकेमध्ये, अनामत दुबार रोख नावे, अनामत जमा नसताना रोख नावे, दुबार कर्ज वाटप, लाभांश वाटप, बँक बोगस भरणा, निरंक दाखले देऊन बोगस जमा पावत्या काढणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत.