Breaking News

देशात दलित, मुस्लिम असुरक्षित - आनंदराज आंबेडकर

रत्नागिरी, दि. 20, फेब्रुवारी - ‘ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशातील जनता भिकारी’ या गुजराती म्हणीप्रमाणे देशाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. देशात दलित आणि मुस्लिम असुरक्षित आहेत. भाजपचे नेते राजकारणासाठी देशात दुही माजविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज चिपळूण येथे पत्रकार परिषदेत केली. 


रिपब्लिकन सेनेतर्फे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आंबेडकर आज चिपळूणला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, देशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षा घेऊन केंद्रात मोदी सरकारला निवडून दिले. मात्र सामाजिक सलोखा, विकास अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरली आहे. शेजारचे एकही राष्ट्र भारताचा मित्र राहिलेले नाही. पाकिस्तान, चीन हे भारताचे पहिल्यापासून शत्रू आहेत. त्यामध्ये नव्या राष्ट्रांचीही भर पडली आहे. मोदी सरकारच्या काळात झालेले हजारो कोटींचे घोटाळे आता बाहेर पडत आहेत. पाचशे कोटींची विमाने दीड हजार कोटींमध्ये मोदी सरकारने घेतली. हे सरकार गरीब व सामान्य लोकांचे हित लक्षात न घेता श्रीमंत लोकांसाठीच काम करत असल्याचे दिसते. शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात जाऊन परदेशी देशांना डॉलरमध्ये मदत जाहीर करत आहेत. भाजप सरकारमुळे अल्पसंख्याक समाज असुरक्षित आहे. दलित आणि मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. सत्तेच्या पडद्यामागून अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मुस्लिमांचे योगदान मोठे असताना मुस्लिमांनी देशात राहू नये असे भाजप नेते सांगतात. म्हणजेच त्यांना सत्तेचा माज आहे. देशात जाती, धर्माचे राजकारण करून फू ट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्रात दोन वेळा शिवजयंतीचे कार्यक्रम होणे ही बाब अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी आहे. यातून शिवजयंतीचे महत्त्व कमी करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक होते. परंतु काहींनी राजकारणासाठी राष्ट्रपुरुषांची वाटणी करून घेतली आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही. रयतेच्या या राजाचे महत्त्व आम्ही लोकांना पटवून सांगणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेच्या नावावर राजकारण करून केंद्रातील सत्तेत मंत्रिपद मिळवले. आंबेडकरी जनतेवर हल्ला होत असताना आठवले गप्प राहिले. त्यामुळे आठवलेंना आंबेडकरी जनतेचे किंवा दलितांचे नेते म्हणायचे का, असा प्रश्‍न पडतो. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कायदा करण्यास विरोध झाला म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दलितांवर हल्ला होत असताना आठवले मात्र सत्तेला चिकटून राहिल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली.